बहादूरा/नागपूर : सद्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत अश्यातच जर अतिवृष्टी झाली तर जनजीवन विस्कळीत होऊन अस्वच्छतेचा अभाव निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.अश्यातच नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असते. मात्र बहादूरा नगर पंचायतीच्या हद्दीत असे बहुतांश प्लॉट खाली पडलेले आहेत ज्यामध्ये कुठल्याही प्रकारचे भरण भरलेले दिसून येत नाही त्यामुळे पावसाचे तसेच सांडपाणी जमा रहात असल्याने परिसरात दुर्गंधीचे वातावरण निर्माण होऊन नागरिकांच्या आरोग्याची समस्या निर्माण होते. या बाबी लक्षात घेता नगरपंचायत प्रशासनाच्या वतीने खाली प्लॉट धारकांना अश्या सूचना दिल्या होत्या की, आपल्या हद्दीतील खाली असलेल्या प्लॉटधारकांनी स्वत: भरण भरून प्लॉट स्वच्छ ठेवावे,कुठेही पाणी जमा राहता कामा नये असे निर्देश व फलक सुद्धा लावण्यात आले आहे मात्र त्याचा प्रभाव पडत नसल्याचे चित्र दिसत नाही.त्यामुळे आता नगरपंचायत प्रशासनाने ज्या ज्या प्लॉटधारकांनी अजूनही आपल्या खाली प्लॉटांवर भरण टाकलेले नाहीत ज्यांमुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची चिन्ह दिसत आहेत अश्या प्लॉट धारकांवर आता नगरपंचायत प्रशासनाच्या वतीने त्या ठिकाणी सुचना फलक लावून त्यांचेवर कायदेशिर कारवाई करण्यात येईल अश्या सूचना दिलेल्या आहेत.फलक लावूनही जर दिलेल्या कालावधीत प्रशासनाच्या निर्देशाचे पालन केले नाही तर आपला टॅक्स रद्द करून आपला प्लॉट बहादूरा नगरपंचायतच्या ताब्यामध्ये घेण्यात येईल. असे फलक लावल्यामुळे आता परिसरातील बहुतांश प्लॉट धारकांनी भरण भरून स्वच्छता केल्याचे पाहायला मिळते.

बहादूरा नगरपंचायतच्या या धडक कारवाईमुळे जनतेचा त्रास कमी होऊन आरोग्य सुरक्षित झाल्याचा आनंद सर्वत्र नागरिकांमध्ये दिसून येत आहे. सदरहू कारवाईची स्तुती होत असून नगरपंचायतीचे मुख्याधिकारी राजेंद्र चिखलकुंदे, प्रशासकीय अधिकारी सागर ठाकरे यांसह कर्मचाऱ्यांचे परिसरातील जनता कौतुक करीत आहे. नगरपंचायतीने सूचनाफलक लावल्यानंतरही ज्या प्लॉट धारकांनी सूचनेचे पालन केले नाही त्यावर नगरपंचायत बहादुरा खरचं जप्तीची कारवाई करणार काय? याकडे सर्व जनतेचे लक्ष लागले आहे.


